Father's day च्या निमित्ताने

Father's day च्या निमित्ताने

नुकतंच बाबांच्या पुतळ्याचं अनावरण झालं आणि पाठोपाठ दोनच दिवसात Father's day यावा हा एक योगायोग. Father's Day ही संकल्पना जरी पाश्चात्य असली, तरीही आपल्या वडिलांविषयी आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी देणारा एक दिवस म्हणून याकडे पहायला निश्चितच हरकत नाही... मुलगा म्हणून त्यांनी वडिलांच्या भूमिकेतून मला जे संस्कार, जी शिकवण दिली ती तर अमूल्य आहेच, त्याचबरोबर मी लहानपणापासून पाहत आलोय ती त्यांची कागलसाठी, जनतेसाठी असणारी तळमळ, त्यांच्या भल्यासाठी कार्यरत राहण्याचा स्वभाव आणि झोकून देऊन काम करण्याची वृत्ती. जनतेच्या मनात त्यांच्याविषयी असणारा आदर व प्रेम लहानपणापासून मी अनुभवले. प्रत्येक मूल आपल्या आई वडिलांना आपला पहिला आदर्श मानते. माझ्यासाठीही बाबा कायमच माझे रोल मॉडेल राहिले आहेत. आधुनिक विचार अंगिकारणे व समाजाच्या भल्याच्या दृष्टीने ते अमलात आणणे ही परंपरा आमच्या कुटुंबाने कायम जपली. छत्रपती शाहू महाराजांचा वारसा आपल्या घराण्याला मिळाला हे तर माझ्यासाठी अभिमानाचे आहेच, तसंच बाबांच्या वागण्यातून त्यांनी तो वारसा टिकवून ठेवल्याचं, सक्षमपणे पुढे नेल्याचं पहात मी मोठा झालो याचाही मोठा अभिमान मला वाटतो. त्यांच्या निधनामुळे जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढणे तर शक्य नाही, पण त्यांचा आदर्श पुढे नेण्याचा निर्धार मात्र पक्का आहे. बाप होणे काय असते हे बाप झाल्यानंतर कळते असे म्हणले जाते. माझ्या बाबांकडून मला मिळालेले संस्कार, शिकवण मला माझ्या मुलालाही देता यावी, हाच माझा प्रयत्न असेल. याचबरोबर जो विश्वास बाबांविषयी जनतेला होता, तो कागलकरांचा आधार होता. त्याच सक्षमतेने, तेवढ्याच खंबीरपणे कागलच्या प्रत्येक नागरिकासाठी, जनतेच्या सेवेसाठी मी कायम सज्ज असेन ही खात्री मी देतो.

जलसमृद्ध व्हावी भूमी, माती सुपीक कसदार, बहरून यावी शेती,
सदैव वाढत राहो कागल, गडहिंग्लज, उत्तूर परिसराची महती
TOP